About Us
इसरूळ ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे. 🌹🙏🙏
इसरूळ ग्रामपंचायत कार्यालय प्रशस्त आणि सर्व सुविधा युक्त आहे. गावातील लोकांच्या विशेष योगदानामुळे गावातील विकास कामांना गती मिळण्यामध्ये मोलाचा सहभाग आहे. ग्रामपंचायत मध्ये सर्व नागरिकांना एका क्लिकवर सर्व दाखले मिळतात तर घर कर पाणी कर भरणा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने भरू शकतात. यामध्ये सरपंच सतीश पाटील, ग्रामविकास अधिकारी संदीप रिंढे तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, महिला बचत गत, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील गावातील विविध स्वच्छता अभियान, शिबिरे, महापुरुषांच्या जयंती निमित्त कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवत असतात, सर्व जाती-धर्माचे लोक गावांमध्ये सलोख्याने व गुण्यागोविंदाने राहतात.
इसरूळ हे विदर्भ मराठवाड्याच्या सीमेवर असलेले तसेच चिखली तालुक्यातील शेवटचे गाव आहे. चिखली वरून मलगी फाट्यापासून दक्षिणेस 18 कि. मी अंतरावर आहे.तर देऊळगाव मही पासून पश्चिमेस 12 किलोमीटर अंतरावर आहे. इसरूळ गावची लोकसंख्या ही 2011 च्या जनगणनेनुसार 2450 एवढी असून, विविध जाती धर्माचे लोक या गावामध्ये गुण्यागोविंदाने या ठिकाणी राहतात.खडकपूर्णा प्रकल्पामुळे या गावाचे पुनर्वसन झाले असून इसरूळ या नवीन गावाची पुनर्रचना झालेली आहे. गावामध्ये प्रसिद्ध शिवकालीन जगदंबा मातेचे प्राचीन मंदिर आहे, तसेच हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हयात हजरत कलंदर बाबाचा दर्गा असून, कलंदर बाबा ची मोठी यात्रा या ठिकाणी दरवर्षी भरत असते, इसरूळ हे गाव वारकरी सांप्रदाय तसेच अध्यात्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. गावामध्ये श्री सिद्धिविनायक गणेशाचे भव्य मंदिर आहे, मारुती महाराजांचे सुद्धा भव्य मंदिर आहे, गजानन महाराज मंदिर,विठ्ठल रखुमाई मंदिर, मुक्ताबाई मंदिर, रामदेवजी बाबा मंदिर श्रीकृष्ण मंदिर,महादेवाचे मंदिर, खंडोबा महाराज मंदिर, श्री दत्त मंदिर, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, गौतम बुद्ध, यांचे पुतळे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा असून सर्व ठिकाणी सुशोभीकरण व सौंदर्यीकरण करण्यात आलेले आहे. तर या सर्व ठिकाणी सी.सी.टीव्ही कॅमेरे सुद्धा ग्रामपंचायत च्या वतीने बसविण्यात आलेले आहे. इसरूळ येथील 1 ते 8 पर्यंत जिल्हा परिषद ISO प्रमाणित शाळा असून पाहण्यायोग्य आहे, येथील शिक्षणाचा दर्जा हा उंचावलेला आहे.या शाळेमध्ये अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा तसेच कॉम्प्युटर लॅब प्रशस्त शाळेची बिल्डिंग मुलांना खेळण्यासाठी ग्राउंड, वाचण्यासाठी वाचनालय, खेळण्यासाठी खेळाचे साहित्य, मुलांसाठी स्वच्छ वाटर फिल्टर चे पाणी, कबड्डी, खो-खो, टेनिस बॉल यांचे ग्राउंड मुलांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. येथील मुलांची पटसंख्या सुद्धा 270 पर्यंत आहे.येथे जि.प उर्दू शाळा आहे या शाळेची वेगळी बिल्डिंग आहे, तसेच जि.प शाळा इंदिरानगर ची सुद्धा एक वेगळी शाळा या ठिकाणी आहे. 3 अंगणवाडी या इसरूळ गावात आहे, श्री संभाजी राजे विद्यालय इसरूळ 8 ते 10,तसेच भास्कररावजी शिंगणे साहेब कला व वाणिज्य महाविद्यालय 11 ते 12 वी पर्यंतचे शिक्षण सुद्धा मुलांना गावातच घेता येते. इसरूळ गावातील संपूर्ण शाळा सी.सी.टीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आहे.
इसरूळ या गावातील तब्बल 64 मुलं देश सेवेमध्ये सेवा देण्यासाठी आहे. इसरूळ या गावातील बहुतांश लोकांचा व्यवसाय हा शेती आहे, त्याला सोबतच पूरक व्यवसाय म्हणून दुधाळ जनावर सुद्धा लोक सांभाळून दूध व्यवसाय या गावात जोरात चालतो. गावातच दूधडेरी च्या माध्यमातून(2000) दोन हजार लिटर दुधाच संकलन या ठिकाणाहून रोज होत असते.
दर गुरुवारी गावातच मोठा बाजार या ठिकाणी भरत असतो. तसेच गावात सर्व महापुरुष यांच्या जयंती,कार्यक्रम,अखंड हरिनाम सप्ताह, मोठ्या उत्साहात साजरे करण्यात येतात. महिला बचत गटाच्या माध्यमातून 30 बचत गट एकसंघ गावामध्ये आहे.त्या गटाच्या माध्यमातून 300 महिला यामध्ये काम करतात. गावामध्ये ग्रामपंचायतने प्लास्टिक बंदीचा ठराव घेऊन गावातील कार्यक्रमांसाठी स्टीलचे ताट व ग्लास वाटप करण्यात आलेले आहे. त्यामुळे स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी बचत गटातील महिलांचा सिंहाचा वाटा असतो. महिला बचत गट हे दर आठवड्याला गावात स्वच्छता मोहीम राबवतात. इसरूळ ग्रामपंचायत ने दोन वॉटर एटीएम च्या माध्यमातून संपूर्ण गावाला 5 रुपयामध्ये 20 लिटर शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिलेले आहे. गावातील तंटे गावात कसे मिटतील या उद्देशाने गावचे सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक हे प्रभावीपणे काम करत असतात. इसरूळ गावाची स्मशानभूमी प्रशस्त असून येथे महादेवाचे भव्य मूर्ती बसवण्यात आलेली आहे, नागरिकांना बसण्यासाठी बैठक शेड तसेच शंभर ते दीडशे बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे, हिरवाईने नटलेला हा परिसर आणि खडकपूर्णा प्रकल्पाचे बॅकवॉटर यामुळे अजूनच या मुक्तीधामला रूप आलेल आहे. गोसावी समाजासाठी स्पेशल दफनभूमी तसेच मुस्लिम समाजासाठी कब्रस्तान आहे.